सासवड : विशेष प्रतिनिधी
Saswad Election : पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवड नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी तयारीचा धडाका लावला आहे. नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरेही “यंदा नगरसेवकपद मिळवायचेच” असा निर्धार करून मैदानात उतरले आहेत.
यावेळी सासवड नगरपालिकेत 11 प्रभागांतून नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवकांची निवड होणार आहे. निवडणुका विलंबित झाल्याने मागील एक टर्म वाया गेल्याची भावना व्यक्त होत असून, त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह आणि चुरस दिसत आहे.
नगरसेवकपद हे सासवडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जाते. शहरातील कार्यक्रमांमध्ये नगरसेवकांना विशेष मान दिला जातो. त्यामुळे नगरसेवकपद मिळवण्यासाठी सर्वच इच्छुक आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर आणि शहरभर लावण्यात आलेले फ्लेक्स ‘भावी नगरसेवक’, ‘भावी जनसेवक’, ‘यंदा दादाच’, ‘अक्का’, ‘तात्या’, ‘भाऊ’ अशा घोषणांनी गजबजले आहेत.
मतदारांना खुश करण्यासाठी काही उमेदवारांनी खर्चाची पर्वा न करता मोहीम उभी केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, धार्मिक सहली आणि पर्यटनाच्या कार्यक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा सुरू आहे. काहींनी तर यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतली आहे.
आगामी निवडणुका अटीतटीच्या आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सासवडमध्ये पुन्हा एकदा ‘नगरसेवकपदासाठीचा महासंग्राम’ पेटण्याची चाहूल लागली आहे.








