Pune News : पुणे शहरात मेट्रोचं जाळं पसरत असून वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने विविध सुविधा केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुणेकरांना आता तिसरा डबलडेकर उड्डाणपूल मिळणार आहे. हा उड्डाणपूल कोथरुड डेपो येथे उभारला जाणार आहे. पुणे मेट्रो फेज – 2 च्या विस्ताराचा भाग म्हणून हा डबलडेकर बांधला जात आहे. हा उड्डाणपुलाचा विस्तार वानवडी ते चांदनी चौक या मार्गावर होणार आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि नळ स्टॉप इथे डबल डेकर पूल उभारण्यात आला आहे. या डबल डेकर पुलाच्या डिझाइनचा वापर येथे केला जाईल. या दोन्ही ठिकाणी पूर्वी वाहतूक कोंडीची मोठी समस्या होती, परंतु डबल डेकर उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
पुणे शहरात दोन ठिकाणी डबल डेकर उड्डाणपुलांचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. आता कोथरुडमधील या नवीन उड्डाणपूलमुळे पौड रोड आणि चांदनी चौकाकडील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.
महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नळ स्टॉप येथील डबल डेकर पुलासाठी भूसंपादन करण्यात आलं होतं. मात्र या प्रकल्पात भूसंपादनाची समस्या येणार नाही. आता कोथरुड भागात जिथे डबलडेकर पूल उभारला जाणार आहे, तिथे पुरेशी रस्ता रुंदी उपलब्ध आहे. इथे भूसंपादनाची कोणतीही समस्या नाही. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा न येता हा डबलडेकर उड्डाणपूल बांधता येईल.
सुरुवातीला महामेट्रो या पुलाच्या बांधकाम कामासाठी निधी पुरवेल. आवश्यकता असल्यास पुणे महानगरपालिकेकडे आर्थिक मदतीसाठी संपर्क साधू’.
तसंच, मेट्रो मार्गाचा सुमारे 700 मीटर भाग आधीच बांधला गेला आहे, तर उर्वरित 1.123 किलोमीटरचं काम अजून बाकी आहे. या नवीन प्रकल्पात 1.123 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट आणि कोथरुड बस डेपो आणि चांदनी चौक इथे दोन मेट्रो स्टेशन आहेत, असंही गाडगीळ यांनी सांगितलं.








