Pune Ring Road News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन मोठ्या रिंग रोड प्रकल्पांना गती मिळत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) या दोन वेगवेगळ्या संस्थांकडून हे प्रकल्प राबवले जात आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड प्रकल्प सध्या प्रत्यक्षात सुरू असून, भूसंपादन पूर्ण झालेल्या काही भागात काम सुरु आहे. येत्या काही महिन्यांत या रिंग रोडचे स्वरूप प्रत्यक्षात दिसू लागेल.
दरम्यान, PMRDA च्या इनर रिंग रोड प्रकल्पाबाबतही महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हा बहुप्रतिक्षित प्रकल्प एकूण ८३.१२ किलोमीटर लांबीचा असून, तो सात टप्प्यांत विकसित केला जाणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिंग रोडचे टप्पे खालीलप्रमाणे:
1️⃣ टप्पा १: सोलू ते वडगाव शिंदे (१०.४ किमी)
2️⃣ टप्पा २: नगर रोड ते सोलापूर रोड (१२.२९ किमी)
3️⃣ टप्पा ३: सोलापूर रोड ते सासवड रोड (६.१४ किमी)
4️⃣ टप्पा ४: सासवड रोड ते सातारा रोड (१४.५७ किमी)
5️⃣ टप्पा ५: सातारा रोड ते पौड रोड (१२.४ किमी)
6️⃣ टप्पा ६: पौड रोड ते महालुंगे-नांदे रोड (१०.५५ किमी)
7️⃣ टप्पा ७: महालुंगे-नांदे रोड ते परंदवडी इंटरचेंज (१६.७७ किमी)
सध्या पहिल्या टप्प्याचे भूसंपादन सुरू असून, उर्वरित सहा टप्प्यांसाठी प्राथमिक सर्वेक्षण आणि आराखडे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पासाठी ग्रामीण व उपनगरी भागातील मोठ्या प्रमाणावर जमीन लागणार असून, संबंधित जमिनमालकांसोबत PMRDA सातत्याने चर्चा करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, प्रकल्पाचे काम सध्याच्या गतीनेच पुढे चालू राहिले, तर हा रिंग रोड पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते अडीच दशकांचा कालावधी लागू शकतो. निधी उभारणी आणि भूसंपादनातील अडचणी या प्रकल्पासमोर मोठे आव्हान ठरणार आहेत.
म्हणूनच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य आणि प्रत्यक्षात तो कधी पूर्ण होणार, हे पाहणे खरोखरच उत्सुकतेचे ठरणार आहे.








