खडकवासला–स्वारगेट–खराडी मेट्रो मार्गाला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असताना, या मार्गावर अत्याधुनिक ‘ड्रायव्हरलेस’ मेट्रो चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. महामेट्रोकडून सध्या या स्वयंचलित मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून, एकूण 25 अशा मेट्रो ट्रेन धाववण्याची योजना आहे.
या ट्रेन चालकाविना अत्याधुनिक यंत्रणेद्वारे चालविण्यात येणार असून, दिल्लीसह देशातील काही शहरांमध्ये जसे ऑटोमेटेड मेट्रोचे यशस्वी संचालन सुरू आहे, त्याच धर्तीवर पुण्याच्या या मार्गावरही सेवा देण्याचा विचार आहे.
पुर्ण स्वयंचलित मेट्रोसाठी विशेष प्रकारच्या डब्यांची आवश्यकता असते. या डब्यांमध्ये लोकोपायलट केबिन नसल्याने प्रवाशांना पारदर्शक काचेद्वारे ट्रेनची समोरील दिशा पाहता येते. अशा आधुनिक सुविधांनी सज्ज 25 मेट्रो खरेदी करण्याची तयारी सुरू आहे.
सध्या पिंपरी–चिंचवड ते निगडीपर्यंतचे मेट्रो काम वेगात सुरू आहे, तर इतर मार्गांची प्रक्रिया निविदा टप्प्यात आहे. प्रस्तावित मार्ग हा सर्वात मोठा असल्याने या मार्गावर अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.








