लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता लवकरच खात्यात जमा होणार – शासनाचा महत्त्वाचा निर्णय जारी

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पात्र महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठी खुशखबर आहे. सामाजिक न्याय विभागाने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे तब्बल ₹410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा ₹1500 चा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या निधीविषयीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे.

✳️ लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपणार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जुलै 2024 मध्ये सुरु करण्यात आली होती. या कालावधीत जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान लाभार्थींना एकूण 14 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या सुरुवातीला मिळाला होता. आता सरकारने पुढील हप्ता देण्यासाठी आवश्यक निधी वर्ग केल्याने, सप्टेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांतच जमा होण्याची शक्यता आहे.

✳️ लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

सरकारने योजनेच्या पात्रतेसाठी ठरवलेला महत्त्वाचा निकष म्हणजे – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे. या उत्पन्न निकषानुसार पात्र महिलांची पडताळणी करण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेत लाभार्थींनी स्वतःच्या आधार क्रमांकासह पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक पडताळावा लागेल.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थींना दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

✳️ लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अनियमितता आढळून आल्याने शासनाने गृहभेटी आणि चौकशी सुरू केली आहे. एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्याच्या प्रकरणांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यात हक्काचा सप्टेंबर हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलण्याची शक्यता आहे.