मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात ठामपणे लढणार! : शिवराज मोरे

मुंबई, सप्टेंबर २०२५:  संघटन मजबूत करून तरुणांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात संघर्ष करणार असून मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरी विरोधातही युवक काँग्रेस ठामपणे लढणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक अध्यक्ष शिवराज मोरे, सहप्रभारी नवज्योत सिंग संधू जी, शाम्भवी शुक्ला जी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मागील काळातील कामगिरीचा आढावा घेत, आगामी काळातील युवक काँग्रेसच्या कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

यावळी बोलताना प्रभारी अजय छिकारा म्हणाले की, महाराष्ट्र युवक काँग्रेसने बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे. मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात युवक काँग्रेस लढा देईल. हा लढा लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे.

या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने मतदार यादीतील गोंधळ व मतचोरीच्या विरोधात लढा उभारण्याचा ठाम निर्धार केला. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बूथ स्तरावर मतदार यादीची तपासणी करून मतदारांना न्याय देण्यासाठी सज्ज होतील. पुढील एक महिनाभर महाराष्ट्र युवक काँग्रेस बूथवार मतदार यादीवर काम करून, आवश्यक माहिती गोळा करून पुढील रणनीती आखणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती युवक काँग्रेसच्या मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन यांनी दिली आहे.