पुणे : लोहगाव येथील हवाई दल वसाहतीत खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (ता.११) दुपारी घडली. या प्रकरणी संबंधित महिला मोटारचालकाविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत बालकाचे नाव विदार्थ विपिन मावी (वय २) असे आहे. त्याचे वडील विपिन राजसिंग मावी (वय ३४) हे हवाई दलात कार्यरत असून कुटुंबासह लोहगाव येथील हवाई दल वसाहतीत राहतात.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विदार्थ घरासमोर खेळत असताना वसाहतीतीलच एका महिलेच्या मोटारीने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या विदार्थला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर विमानतळ पोलिसांनी महिला मोटारचालकावर गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार धेंडे पुढील तपास करत आहेत.