पुणे, सप्टेंबर २०२५: मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे अत्यंत उच्च-धोका असलेल्या एका वृद्ध रुग्णावर ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) ही हृदय झडप प्रत्यारोपणाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या प्रक्रियेमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाचे जीवन वाचले असून त्यांना पुन्हा एकदा दर्जेदार जीवन जगण्याची नवी संधी मिळाली आहे.
एऑर्टिक व्हॉल्व स्टेनोसिस हा वृद्धांमध्ये आढळणारा झडपांचा आजार असून त्यात झडप अरुंद व कडक होते. परिणामी हृदयातून शरीरात जाणारा रक्तप्रवाह अडथळलेला राहतो. श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार हृदयविकाराचा झटका किंवा अकस्मात मृत्यूचे कारण ठरू शकतो. आतापर्यंत या आजारावर उघड्या हृदयाची शस्त्रक्रिया (SAVR) हा मुख्य पर्याय होता. मात्र, वयोमान, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा व स्थूलता अशा अनेक सहव्याधींमुळे श्रीमती राणा या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेचा धोका अत्यंत वाढलेला होता. त्यामुळे तज्ज्ञांनी पर्याय म्हणून TAVI प्रक्रिया निवडली.
फेमोरल आर्टरीमार्गे कॅथेटरच्या साहाय्याने करण्यात आलेली ही प्रक्रिया डॉ. सोनम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. रुग्णाच्या हृदयाचे कार्य सुरळीत राहावे यासाठी डॉ. प्रशांत शिंदे यांनी देखरेख केली, तर डॉ. मनीक चोप्रा यांनी मार्गदर्शन केले. तज्ज्ञ कॅथलॅब टीमच्या सहकार्याने प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली व प्रतिमांकनाद्वारे नवीन झडप योग्यरीत्या कार्यरत असल्याची खात्री झाली.
रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे स्थिर राहिले. फक्त २४ तासांत चालण्यास सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. सध्या त्या दैनंदिन कामकाज सहजपणे करत असून हृदयाचे कार्य पूर्वीपेक्षा अधिक सुधारले आहे.
यशस्वी प्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. सोनम शिंदे म्हणाले, “TAVI प्रक्रियेमुळे उच्च-धोका असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेविना सुरक्षित उपचार देणे शक्य झाले आहे. रुग्णाला नवे जीवन मिळवून देण्याची ही क्रांतिकारी पद्धत आहे.”
तर डॉ. प्रशांत शिंदे म्हणाले, “ही शस्त्रक्रिया म्हणजे टीमवर्क आणि अचूकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. रुग्ण फक्त एका दिवसात चालू लागले आणि लवकर बरे झाले, हे आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”
मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथील ही कामगिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर आणि गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेच्या बांधिलकीचे द्योतक ठरली आहे.