नवी दिल्ली मानस मते) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी सर्व बँक शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण सुरळीत पार पाडण्यासाठी घेण्यात आला आहे.
काय आहे निर्णयामागील कारण?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २०वा हप्ता वितरित करण्यासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याचे नियोजन केले आहे.
२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृतपणे हा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर लगेचच, ३ ऑगस्ट रोजी बँका सुरू ठेवून लाभार्थ्यांना रकमेचा त्वरित लाभ पोहोचवण्याची योजना आखण्यात आली आहे.
एनईएफटी/आरटीजीएस सेवा देखील सुरू
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सर्व बँकांना याबाबत निर्देश दिले असून, २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान शाखा सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ३ ऑगस्ट रोजीही एनईएफटी आणि आरटीजीएस सेवा कार्यरत राहणार आहेत, जेणेकरून रक्कम अडथळ्याविना आणि तातडीने ट्रान्सफर करता येईल.
बँक कर्मचाऱ्यांसाठी विशेष तयारीचे आदेश
बँकांनी त्यांच्या प्रादेशिक व नियंत्रण कार्यालयांना निर्देश दिले आहेत की, ३ ऑगस्ट रोजी पुरेसे कर्मचारी उपस्थित राहतील याची खात्री करून घ्यावी, तसेच कॅश व अन्य निधीचा पुरेसा साठा ठेवावा.
लाभार्थ्यांना वेळेत रक्कम मिळवून देणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न
या निर्णयामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व अचूक पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसून येतो.
रविवारी बँका सुरू ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना रकमेचा थेट आणि त्वरित लाभ मिळणार असून, यंत्रणेतील विलंब टाळला जाणार आहे.