महाराष्ट्राला दिलासा : दोन रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची केंद्र सरकारकडून मंजुरी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत रेल्वेच्या विस्तारासाठी चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचा समावेश असून, त्यांना मल्टीट्रॅकिंगची (एकाहून अधिक रेल्वे मार्ग) मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर ते परभणी आणि इटारसी ते नागपूर या रेल्वे मार्गांना मल्टीट्रॅकिंगची अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

या चारही प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे जाळे सुमारे ५७४ किलोमीटरने वाढणार आहे. हे प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड या राज्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे.

महाराष्ट्रातील मंजूर प्रकल्प:

  • इटारसी-नागपूर रेल्वेमार्गावर चौथ्या मार्गाचे बांधकाम
  • छत्रपती संभाजीनगर-परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायक होईल, तसेच उद्योग व व्यापारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.