School Holiday : शाळांना सुट्टी जाहीर, ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं बंद

School Holiday : पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने 26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना, शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

शुक्रवारी पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, तर आता रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांमध्ये आधीपासूनच संततधार पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या परिसरांसाठीही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट असून, “मुसळधार ते अतिमुसळधार” पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

अलर्ट रंगांचा अर्थ काय?

रेड अलर्ट: तात्काळ कारवाई आवश्यक

ऑरेंज अलर्ट: कारवाईसाठी सज्ज राहा

यलो अलर्ट: सावध राहण्याचा सल्ला

उल्हास नदीच्या पातळीत वाढ
कर्जत परिसरात मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पातळी वाढली आहे. रायगड जिल्ह्यात कालपासून संततधार सुरू असून, उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. सध्या बदलापूर शहरात पाणी साचल्याच्या घटना नाहीत, पण प्रशासनाने नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरातील राधानगरी धरण 99% भरले
कोल्हापुरातील राधानगरी धरणाची पातळी 99% झाली असून, स्वयंचलित दरवाजांद्वारे पाण्याचा विसर्ग कधीही सुरू होऊ शकतो. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरण जलद भरत आहे. जिल्ह्यातील सात धरणे आधीच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्यास पंचगंगा व भोगावती नद्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकिनारी असलेल्या गावांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.