पुणे: जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नशामुक्त, निरोगी समाजाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करत ‘नशा मुक्त भारत अभियान’ राबविण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
सूर्यदत्त नॅशनल स्कुल, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज, सूर्यदत्त पब्लिक स्कुलमधील विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारतासाठी पदयात्रा काढली. ‘से नोप टू डोप, येस टू होप’ असा नारा देत विद्यार्थ्यांनी नशेला नाही म्हणा, आशेला हो म्हणा, असा संदेश दिला. ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी पदयात्रेला झेंडा दाखवला.
संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बावधन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस कर्मचारी सुभाष बहिरट, सुरज टिळेकर, कावेरी बांगर आदी उपस्थित होते. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सूर्यदत्त स्कार्फ व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. नीलिमा मगरे यांनी सर्व पाहुण्यांची ओळख करून दिली. सूर्यदत्त संस्थेतील सर्व विभागांचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने होणाऱ्या विपरीत परिणामांवर आधारित लघुपटांचे स्क्रीनिंग करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. अशोक डोंगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चांगल्या आरोग्याचे महत्व पटवून देत व्यसनांपासून दूर कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी झालेल्या परस्पर संवाद कार्यक्रमात डॉ. डोंगरे यांनी विविध शंकांचे निरसन केले. सूर्यदत्त ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. किरण राव यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधाची शपथ दिली. तसेच अंमली पदार्थमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. नीलिमा मगरे यांनी आभार मानले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांचे व समाजाचे आरोग्य टिकवण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. नशामुक्त समाज म्हणजे प्रगतीशील समाज असतो. प्रत्येक व्यक्तीने जर नशा टाळण्याची ठाम भूमिका घेतली, तर देशातील नागरिक शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ होऊन आपला देश दुप्पट वेगाने प्रगती करू शकतो.”









