Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल २७,३१७ महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले असून, त्यांचा १५०० रुपयांचा मासिक लाभ आता कायमचा थांबवण्यात आला आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ही योजना जून २०२४ मध्ये सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जात होते.
या योजनेचा प्रत्यक्ष लाभ जुलै २०२४ पासून सुरू झाला होता आणि आता योजनेच्या १२ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. यातील शेवटचा हप्ता म्हणजे जून २०२५ चा हप्ता, तो नुकताच जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला आहे.
पण मग एवढ्या महिलांना योजनेतून वगळण्यामागचं कारण काय?
शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्यामुळे, आता योजनेत पात्रतेसाठी अधिक काटेकोर निकष लावले जात आहेत. यामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक महिलांचे अर्ज तपासले गेले आणि पुढील कारणांमुळे त्यांना वगळण्यात आले:
घरात ट्रॅक्टर वगळता कोणतेही चारचाकी वाहन असलेली कुटुंबे
आयकर भरणारे लाभार्थी
‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचे लाभार्थी
‘संजय गांधी निराधार योजना’चे लाभार्थी
एकाच कुटुंबातील अनेक अर्जदार असलेले लाभार्थी
या सर्व कारणांवरून संबंधित महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही, आणि १५०० रुपयांचा मासिक निधी थांबवण्यात आला आहे.
पुढील हप्ता मिळेल का?
योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्रक्रियेत असून तो जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती मिळतेय. मात्र, ज्या महिलांचे नाव या नव्या यादीतून वगळले गेले आहे, त्यांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता नाही.
महत्वाची सूचना : महिलांनी आपली पात्रता पुन्हा तपासून घ्यावी आणि जर अयोग्यपणे वगळले गेले असल्याचे वाटत असेल, तर स्थानिक महसूल कार्यालयाशी अथवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.