नवी दिल्ली, 24: महाराष्ट्र शासनाने 2021, 2022 आणि 2023 या वर्षांसाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची आज घोषणा केली. राजधानी दिल्लीतून महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक मंगेश वैशंपायन यांची वर्ष 2021 साठीच्या प्रतिष्ठित ‘अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ साठी आणि वरिष्ठ पत्रकार निवेदिता खांडेकर यांची वर्ष 2020 साठीच्या ‘अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी, राज्यस्तर)’ साठी निवड करण्यात आली आहे.
यासोबतच, पत्रकारितेतील दीर्घकालीन योगदानासाठी पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये 2019 साठी राही भिडे, 2020 साठी सुधीर पाठक, 2021 साठी भाऊ तोरसेकर, 2022 साठी विजय बाविस्कर (दैनिक लोकमत) आणि 2023 साठी बाळासाहेब जाधव (दैनिक पुढारी) यांचा समावेश आहे.
मंगेश वैशंपायन यांचे योगदान : मंगेश वैशंपायन यांनी 28 वर्षांच्या पत्रकारिता कारकिर्दीत शैलीदार लेखन आणि सखोल वार्तांकनाद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी दैनिक केसरी, युनिक फीचर्स, दैनिक सकाळ आणि सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या दिल्ली कार्यालयात सहायक संपादक म्हणून काम केले आहे. गेल्या 17 वर्षांपासून ते संसद अधिवेशने, महाराष्ट्र सदन, केंद्रीय मंत्रालये आणि राजकीय पक्षांचे वार्तांकन करत आहेत. लालकृष्ण अडवानी, मल्लिकार्जुन खर्रे, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितिन गडकरी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. ‘राजधानीतून’ या सदरातून त्यांनी दिल्लीतील राजकारणापलीकडील सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू वाचकांपर्यंत पोहोचवले. याशिवाय, ते आकाशवाणीवर नैमित्तिक वृत्तनिवेदक आणि संसदेत तत्काळ भाषांतरकार म्हणूनही कार्यरत आहेत.
निवेदिता खांडेकर यांचे योगदान : वरिष्ठ पत्रकार निवेदिता खांडेकर यांनी इंग्रजी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मूळच्या नागपूरच्या असलेल्या निवेदिता यांनी नागपूर विद्यापीठातून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स, फ्री प्रेस जर्नल, द टाइम्स ऑफ इंडिया, आणि न्यूज नाईन प्लस यांसारख्या प्रतिष्ठित माध्यम संस्थांमध्ये काम केले आहे. तसेच, सात वर्षे त्यांनी स्वतंत्र पत्रकार म्हणून लेखन आणि मल्टिमीडिया स्टोरीजद्वारे सामाजिक मुद्दे, पर्यावरण, शिक्षण आणि मानवी हक्क यांसारख्या विषयांवर सखोल वार्तांकन केले आहे. विशेषतः ग्रामीण भारतातील आव्हाने आणि विकासाच्या कहाण्या त्यांनी प्रभावीपणे मांडल्या.
पुरस्कार निवड प्रक्रिया : पुरस्कार निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत पराग करंदीकर, संदीप भारांबे, रवींद्र बेडकीहाळ, जितेंद्र दोशी, स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, सईद अन्सारी, चंद्रकांत शिंदे, निलेश खरे, सम्राट फडणीस आणि संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांचा समावेश होता. समितीने व्यापक चर्चा आणि मूल्यमापनानंतर पुरस्कारार्थींची अंतिम यादी निश्चित केली.
पुरस्कारांचे स्वरूप : ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ हा पत्रकारितेतील दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. तसेच, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्षिक आधारावर पत्रकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान केले जातात. ‘अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारा’साठी 1 लाख रोख आणि सन्मानचिन्ह, दिले जाते. आणि ‘अनंत गोपाळ शेवडे पुरस्कारा’साठी ₹51 हजार रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाते. या पुरस्कारांचे वितरण लवकरच एका औपचारिक सोहळ्यात होणार आहे.