– धातू आणि स्मृतीद्वारे स्त्रियांच्या दडपलेल्या इतिहासांचा शोध घेणारे शिल्प प्रदर्शन
लंडन-स्थित भारतीय कलाकार ब्रिटिश काउन्सिल, नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या प्रदर्शनात पारंपरिक स्त्रीत्वाच्या आख्यायिकांना आव्हान देतात.
१३ जून २०२५ – ब्रिटिश काउन्सिलच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील द गॅलरीमध्ये, स्टडी यूके : क्रिएटिव्ह कनेक्शन्स II या उपक्रमांतर्गत “जात” या शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत खुले राहील. लंडनस्थित भारतीय कलाकार सोनाक्षी यांनी सादर केलेली ही कलाकृती धातू, वारसा आणि अर्थ यांच्या माध्यमातून मातृवंशीय स्मृतींचा शोध घेते.
आग्रा येथे जन्मलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या सोनाक्षी चतुर्वेदी यांनी चित्रकला, इनॅमलिंग (धातूवरील सजावटीची प्रक्रिया) आणि रत्नविद्या यांचा वापर करत स्त्रियांच्या इतिहासाची जाणीवपूर्वक पुसली गेलेली पाने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनात वधू, आई आणि आजी या पारंपरिक भूमिकांना आव्हान देण्यात आले असून, भारतीय उपखंडातील हस्तकला परंपरांमध्ये लपलेल्या स्त्रियांच्या न सांगितलेल्या इच्छा आणि आठवणी यांना केंद्रस्थानी आणले आहे.
समकालीन कलेतील एक नवा आवाज
प्रसिद्ध रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून 2024 मध्ये ज्वेलरी आणि मेटल या विषयात एम.ए. पूर्ण केलेल्या सोनाक्षी या एक नवीन पिढीच्या कलाकारांचे प्रतिनिधित्व करतात, ज्या पारंपरिक हस्तकलेला आधुनिक कला अभिव्यक्तीसोबत जोडण्याचे कार्य करतात. ग्रॅज्युएट जेमोलॉजिस्ट म्हणून, तसेच इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (संस्कृती मंत्रालय) येथे संशोधक म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना दक्षिण आशियातील अलंकरण आणि वारसा यांचा सांस्कृतिक अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता प्राप्त झाल्या आहेत.
“‘जात’ ही संकल्पना सुरुवातीला माझ्या स्वतःच्या स्मृतिरंजनाला (नॉस्टॅल्जिया) आधार देण्यासाठी सुरू केली, पण ती हळूहळू पुनःस्वामित्वाच्या (रिक्लेमेशन) कृतीत परिवर्तित झाली. आई, वधू, आजी म्हणूनच आठवणीत राहिलेल्या स्त्रियांच्या मौन प्रतिकाराचे साक्षीदार असलेल्या वारशाप्राप्त वस्तूंचा मागोवा घेत, शिल्पकलेच्या माध्यमातून मी त्यांच्या मातृवंशीय वारशाला भौतिक स्मृती म्हणून संग्रहित करते, जेणेकरून भविष्यातील स्त्री वंशज त्यांना फक्त निभावलेल्या भूमिकांमधूनच नव्हे, तर स्वप्ने, स्वायत्तता आणि स्वतःचा आवाज असलेल्या व्यक्ती म्हणूनही ओळखू शकतील,” असे चतुर्वेदी स्पष्ट करतात.
भौतिक स्मृतींचा शोध
“जात” या शीर्षकाचा अर्थ, ओळख किंवा अस्तित्वाच्या मूलभावाशी संबंधित आहे. जात या प्रदर्शनात येणाऱ्या पाहुण्यांना विविध शिल्परूपं अनुभवायला मिळतील, जी पितळ, व्हाइट मेटल, कोल्ड इनॅमल, राळआधारित इनॅमल आणि रत्ने या माध्यमांतून साकारलेली आहेत. या प्रत्येक कलाकृतीची प्रेरणा सोनाक्षी यांच्या आजींच्या लग्नातल्या सवाष्ण सामानातून (विवाहाच्या वेळीचा पारंपरिक दागिन्यांचा संच) घेतलेली आहे.
पहिल्या नजरेत ही शिल्पं गंजलेली, धातूप्रमाणे थंड आणि सौम्य वाटतात, जी परंपरेचा आणि घरगुती जबाबदाऱ्या-अपेक्षांचा भार दर्शवितात, पण आतमध्ये मात्र ही कलाकृती रंगीबेरंगी, आकर्षक आणि काहीशी स्वप्नवत दृश्यांनी भरलेली असते. जणू एखादं गोडाधोडाचं, मनोहारी जग उघडतं, जी रंग, इच्छा आणि तारुण्य यांचा लपलेला आविष्कार दाखवते.
या परस्परविरोधी पृष्ठभागांद्वारे सोनाक्षी पिढ्यानपिढ्या आलेल्या स्त्रियांच्या जीवनातील वास्तव उलगडतात, ज्या केवळ पत्नी, आई किंवा आजी म्हणून ओळखल्या गेल्या, पण ज्यांच्या आत एक रंगीबेरंगी, संवेदनशील आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लपलेलं होतं. जात या प्रकल्पातून त्या वारशालाच नव्हे, तर न बोलेलेले, न सांगितलेले अनुभवही शिल्परूपांत साठवले जातात, भौतिक स्मृतीच्या रूपाने.
सोनाक्षी चतुर्वेदी यांचा व्यवसायिक अनुभव द जेम पॅलेस, जयपूर, झोया बाय टाटा, तसेच ओलिंपिया ऑक्शन्स आणि वेदांता यांचं रिव्हरसाइड स्टुडिओ, लंडन या प्रकल्पांमध्ये झालेल्या अलीकडील इंटर्नशिप्सपर्यंत विस्तारित आहे. या अनुभवांमुळे त्यांना पारंपरिक भारतीय दागिन्यांच्या निर्मितीतील सूक्ष्मता आणि आधुनिक आर्टिस्टिक पद्धती यांचा गहिरा अभ्यास करता आला आहे.
प्रतिष्ठित सांस्कृतिक उपक्रमाचा भाग
जात हे प्रदर्शन ब्रिटिश काउन्सिलच्या “बेस्ट ऑफ ब्रिटिश” या प्रतिष्ठित मालिकेचा एक भाग आहे, ज्यामध्ये जगभरातील सांस्कृतिक चर्चेला आकार देणाऱ्या यूकेमधील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. स्टडी यूके: क्रिएटिव्ह कनेक्शन्स II या कार्यक्रमामार्फत युकेच्या शिक्षणाचा जागतिक पातळीवर होणारा कलात्मक परिणाम आणि आंतरसंस्कृती संवादाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
आगामी वाटचाल
सध्या सोनाक्षी Gem-A (FGA) संस्थेमार्फत रत्नविद्येतील उच्च शिक्षण घेत असून, यूकेमधील कलाकारांसोबत इनॅमलिंग (धातूवरील सजावटीची कला) या क्षेत्रातील कौशल्य वाढवत आहेत. पुढे त्या डॉक्टरेट पदवी घेण्याची योजना आखत आहेत, ज्यामार्फत सांस्कृतिक आणि लिंगाधारित ओळख या विषयांवर एक समुदायस्तरीय कला अभ्यास विकसित करून पारंपरिक हस्तकलेवर आधारित व्यापक सांस्कृतिक चर्चेत आपले योगदान देतील.
प्रदर्शनाची माहिती (Exhibition Details):
काय: जात – सोनाक्षी यांचं शिल्पप्रदर्शन
कोठे: द गॅलरी, ब्रिटिश काउन्सिल, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली
कधी: ११ जून – ३१ जुलै २०२५
उद्घाटन समारंभ: १० जून २०२५
प्रवेश: विनामूल्य
गॅलरी वेळा: सकाळी १० ते संध्याकाळी ६