COVID-19 Update : सध्या आढळणारा कोरोनाचा स्ट्रेन सौम्य, पुणे महापालिकेला एनआयव्हीची माहिती
पुणे, दि. ११ जून २०२५ — सध्या राज्यात आढळणारा कोरोनाचा नवीन स्ट्रेन तुलनेने सौम्य असून, तो गंभीर लक्षणे निर्माण करत नसल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) पुणे महानगरपालिकेला दिली आहे. विशेषतः सहव्याधी असलेल्या व्यक्तींमध्येच काही लक्षणे दिसून येत असून, अशा रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निष्कर्ष मांडण्यात आला. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, डॉ. बोराडे, ‘एनआयव्ही’ व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) यांचे प्रतिनिधी तसेच कोरोना कृतिदलाचे सदस्य उपस्थित होते.
‘एनआयव्ही’च्या शास्त्रज्ञांनी जनुकीय क्रमनिर्धारणाच्या (Genome Sequencing) आधारे सध्या आढळणारा विषाणू सौम्य स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विशेषतः वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आयुक्त राम यांनी दिल्या.
राज्यभरात ९ जून रोजी एकूण ६५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २६, मुंबईत २२, तर नागपूर महानगरपालिका हद्दीत ४ रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात एकूण ६१३ सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत राज्यात १७,२९२ चाचण्या करण्यात आल्या असून त्यामधून १,५०४ रुग्ण बाधित आढळले आहेत. यापैकी ८७३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.०४ टक्के इतके आहे.
महापालिकेने नागरिकांना घाबरून न जाता, आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि नियमित हात धुणे यासारख्या मूलभूत उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.