Bullet Train Station : बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
Bullet Train Station : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम झपाट्याने सुरू असून, आता या प्रकल्पात एक मोठं यश मिळालं आहे. गुजरातमधील सूरत येथे देशातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन जवळपास पूर्णत्वास आलं असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वपूर्ण प्रगतीची माहिती दिली आहे.
या प्रकल्पात ३०० किमी लांबीचा वायाडक्ट तयार करण्यात आला आहे. यातील २५७ किमी भाग फुल स्पॅन लाँचिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे कामात गती आली. या मार्गावर अनेक लांब नदी पूल, स्टील आणि पीएससी ब्रिजेस तसेच स्टेशन इमारतींचे कामही करण्यात आलं आहे.
आतापर्यंत प्रकल्पांतर्गत
-
३८३ किमी पीयर्स,
-
४०१ किमी फाउंडेशन,
-
३२६ किमी गर्डर कास्टिंगचं काम पूर्ण झालं आहे.
एकूण तीन बुलेट ट्रेन स्टेशनपैकी सूरतचं स्टेशन सर्वात पुढे आहे. गुजरातमध्ये सुमारे १५७ किमी मार्ग जवळपास पूर्ण झाला असून, पुढील वर्षापासून या मार्गावर चाचणी धावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी खास डेपो उभारले जात आहेत. सर्व काम नियोजनानुसार पार पडलं, तर २०२६ च्या ऑगस्ट महिन्यात सुरत ते बिलिमोरा या स्थानकांदरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावेल, असा अंदाज आहे.
तसेच, जपानमधील शिंकान्सेन ट्रेनचे डबे देखील पुढील वर्षाच्या सुरुवातीस भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पूर्ण कार्यान्वयनासाठी २०२९ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.