प्रतिनिधी – मानस, बीजिंग : चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वेग झपाट्याने वाढत असून त्याचे गंभीर परिणाम आता रोजगार क्षेत्रावर दिसू लागले आहेत. विशेषतः रोबोटॅक्सी आणि फूड-डिलिव्हरी ड्रोनमुळे लाखो चालकांच्या नोकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. किंगदाओसारखी शहरे आता मानवी श्रम आणि ऑटोमेशनमधील संघर्षाची प्रयोगशाळा बनत आहेत.
अवघ्या एका वर्षापूर्वी किंगदाओमध्ये स्वायत्त वाहने अत्यल्प प्रमाणात होती. मात्र आता हे शहर जगातील अत्याधुनिक ऑटोमेशन शहरांपैकी एक मानले जात आहे. निओलिक्स कंपनीने येथे 1,200 मानवरहित डिलिव्हरी व्हॅन्स सुरू केल्या असून डिसेंबरपर्यंत ही संख्या 4,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरातील रस्त्यांवर रोबोटॅक्सी आणि डिलिव्हरी ड्रोन मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत.
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, 2025 च्या अखेरीस चीनमध्ये 33 हजार शॉर्ट-रेंज डिलिव्हरी वाहने कार्यरत होती. 2026 अखेरीस मानवरहित कॅबची संख्या 14 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील पाच वर्षांत चीनमधील शहरांमध्ये तब्बल 7 लाख रोबोटॅक्सी धावतील, जे एकूण राइड-हेलिंग सेवांपैकी सुमारे 12 टक्के असतील.
चीनमधील आघाडीचे डिलिव्हरी ॲप मीतुआनने अंदाज व्यक्त केला आहे की भविष्यात देशातील 10 टक्के फूड डिलिव्हरी ड्रोनद्वारे केली जाऊ शकते. गेल्या वर्षी चीनमध्ये सुमारे 6 हजार कोटी डिलिव्हरी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पारंपरिक चालकांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन सरकारनेही आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे. मार्चमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पंचवार्षिक आर्थिक आराखड्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी रोखण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा दस्तऐवजात कंपन्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की रोजगार कमी करण्यासाठी एआयचा वापर टाळावा.
संशोधन संस्था टॉम ननलिस्टच्या मते, रोजगार वाचवण्यासाठी चिनी एआय नियमांमध्ये करण्यात आलेले असे आवाहन अत्यंत दुर्मिळ आहे. याआधी धोरणात्मक स्तरावर मानवी श्रमसंरक्षणाचे इतके स्पष्ट उदाहरण दिसून आले नव्हते. विशेषतः प्रवासी वाहतूक आणि पार्सल डिलिव्हरी क्षेत्रातील सुमारे 2.2 कोटी चालकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मीतुआनसारख्या कंपन्या चालकांना नव्या भूमिकांसाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात करत आहेत. शांघायमध्ये चालकांना ड्रोन डिलिव्हरी व्यवस्थापन, अन्न लोडिंग आणि कमांड सेंटरमधून देखरेख करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
मात्र चीनमध्ये ऑटोमेशनचा प्रवास अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. वुहान शहरात बायडू कंपनीच्या सुमारे 1,000 रोबोटॅक्सी कार्यरत आहेत. तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मार्चमध्ये डझनभर रोबोटॅक्सी अचानक रस्त्यावर थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
या घटनांनंतर सरकारने नव्या रोबोटॅक्सी परवान्यांवर निर्बंध घातले आहेत. तसेच चालक संघटनांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 2024 मधील निदर्शनांनंतर अधिकाऱ्यांनी बायडूला रोबोटॅक्सीची आकडेवारी सार्वजनिक करण्यास मनाई केली आहे.





