नाशिक : नाशिक शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सातपूर परिसरातून उघडकीस आलेल्या खंडणी प्रकरणाने तपासादरम्यान भीषण वळण घेतले असून, पोलिसांना तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या प्रकरणात सुरुवातीला तक्रारदार असलेलाच व्यक्ती आता मुख्य आरोपी ठरला आहे.
२ एप्रिल रोजी एका ६३ वर्षीय व्यक्तीने चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत संबंधित व्यक्तींनी त्याचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे सातपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही संशयितांना अटक केली.
मात्र, पुढील तपासात प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. पोलिसांनी तक्रारदाराकडून मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड्स जप्त करून त्यांची तपासणी केली. या डिजिटल पुराव्यांमध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या.
प्राथमिक तपासात उघड झाले की, या सर्व व्हिडिओंमध्ये तक्रारदार रवींद्र एरंडे हा विविध महिलांसोबत दिसून येत आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले.
या धक्कादायक घडामोडीनंतर पोलिसांनी रवींद्र एरंडे याला अटक केली असून, प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, आणखी किती पीडित महिला समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





