Pune Crime : रूममेट्सच्या मानसिक त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं; तिघींविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : रूममध्ये सोबत राहणाऱ्या मैत्रिणींकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. सबुरी संतोष काळे असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित तिघींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबुरी ही चंदननगर परिसरातील महावीर सोसायटीमध्ये राहत होती. त्याच रूममध्ये तिच्यासोबत काही मुलीही वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून या तरुणींमध्ये काही कारणास्तव वाद सुरू होते. आरोप आहे की, सबुरीसोबत राहणाऱ्या त्या मुली तिला सातत्याने मानसिक त्रास देत होत्या. तिची समाजात बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या आई-वडिलांना मारून टाकू’, अशा आशयाच्या धमक्या देऊन तिला भीतीखाली ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या धमक्या आणि सततच्या छळामुळे सबुरी प्रचंड मानसिक तणावात होती. कोणाकडे दाद मागावी आणि हा त्रास कसा थांबवावा, या विवंचनेत असतानाच तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. राहत्या खोलीत पंख्याला दोरी बांधून तिने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चंदननगर पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिचे कलेवर शवविच्छेदनासाठी पाठवले.
सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान सबुरीला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि त्रासाची माहिती समोर आल्यानंतर, पोलिसांनी संबंधित तिघींवर गुन्हा दाखल केला आहे. जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या तरुणींमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
एका १९ वर्षीय तरुणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वसतिगृहात किंवा रूम शेअरिंगमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.





