दुमजली एकात्मिक उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत; वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा

By: Editor_Pratik

On: Sunday, March 8, 2026 2:18 PM

Google News
Follow Us

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली एकात्मिक उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणेकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आला. या प्रकल्पामुळे विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मजबूत पायाभूत सुविधांची गरज – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन केले जात आहे. उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचा विस्तार करून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी होत्या; मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला, असे त्यांनी नमूद केले. पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करण्यासाठी रिंग रोड, मेट्रो विस्तार आणि इतर प्रकल्पांवरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणेकरांसाठी महत्त्वाचा टप्पा – सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, विद्यापीठासमोरील हा दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुण्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे.

या प्रकल्पासाठी दिवंगत अजित पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पीएमआरडीएच्या माध्यमातून २७७ कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात आला असून शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून पुण्याला ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्याचे सांगितले.

महापौर मंजुषा नागपुरे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही हा पूल पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

  • एकूण लांबी (रॅम्पसह) : १,७६३.५२ मीटर

  • प्रकल्पाची किंमत : ₹२७७ कोटी

  • वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग, तर खालच्या स्तरावर रस्ता वाहतुकीसाठी उड्डाणपूल

  • औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगरला जोडणारे स्वतंत्र रॅम्प

  • वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटरचा स्टील गर्डर

या प्रकल्पामुळे पुण्याच्या पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या पायाभूत विकासाला नवी गती मिळणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now