मोठी बातमी : हिंगोली, नांदेड, परभणीसह अनेक शहरांत पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी; पेट्रोल संपणार की महागणार?
मराठवाडा : इराण–इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार किंवा इंधनाचे दर वाढणार अशा अफवांनी मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पेट्रोल संपणार असल्याच्या चर्चांना वेग आल्याने नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी अवघ्या काही तासांतच इंधनाचा साठा संपल्याने पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लावावे लागले.
नांदेडमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप
नांदेड शहरात सामाजिक माध्यमांवर पेट्रोल संपणार असल्याची चुकीची माहिती पसरल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी स्वतः पंपांवर जाऊन नागरिकांना समजावले आणि पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.
परभणीत बाटल्या-कॅन घेऊन नागरिकांची गर्दी
परभणीमध्ये या अफवेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या बातम्यांनंतर पेट्रोल महागणार या भीतीने नागरिकांनी पंपांवर मोठी गर्दी केली. काही नागरिक बाटल्या आणि कॅन घेऊन पेट्रोल साठवण्यासाठी पंपांवर पोहोचले. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही तासांतच अनेक पंपांवरील इंधन संपले.
हिंगोलीतही रात्रीपर्यंत रांगा
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली. इंधन साठा संपणार या भीतीमुळे नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या. प्रशासनाने मात्र इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले असून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही अफवांचे पडसाद
छत्रपती संभाजीनगर शहरातही पेट्रोल दरवाढीच्या अफवांमुळे नागरिकांनी पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात थांबेल आणि पेट्रोल पंप बंद पडतील अशा चर्चांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, रविवार आणि धूलिवंदनामुळे काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्याने पंप बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे अफवा अधिक पसरल्याचे सांगितले जाते.
छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी स्पष्ट केले की, सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि युद्धामुळे तातडीने कोणताही परिणाम झालेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.









