Pandharpur Crime News : अवघ्या दहा मिनिटांत मायलेकाचा खून; तपास अधिकारी बदलल्यानंतर ‘त्या’ पंढरपूर दुहेरी हत्याकांडाचा उलगडा
पंढरपूर : आषाढी वारीनंतर पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाने राज्यभर खळबळ उडाली होती. तब्बल आठ महिने उलटूनही आरोपींचा माग लागत नसल्याने पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. तपासासाठी आंदोलने झाली, अधिकारी बदलले; मात्र गुन्ह्याचे गूढ कायम होते. अखेर तपासाची जबाबदारी आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा करत आरोपींना अटक केली.
पंढरपूरमधील लखन संजय जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप यांची रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घरात घुसून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. लखनवर तब्बल १६ वार करण्यात आले, तर हा प्रकार पाहणाऱ्या आई सुरेखा यांनाही नऊ वार करून ठार मारण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांत आरोपींनी दुहेरी खून करून तेथून पळ काढला होता.
घटनास्थळी कोणताही CCTV पुरावा मिळाला नव्हता. सुरुवातीला तपासाला ठोस दिशा मिळत नव्हती. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तपासाची सूत्रे हातात घेतल्यानंतर संपूर्ण तपास नव्याने सुरू करण्यात आला. तब्बल दीड हजार फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्स तपासण्यात आले. या डिजिटल तपासातून संशयाची साखळी उलगडत गेली.
खुनासाठी गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास हत्यार तयार करण्यात आले होते. आरोपींपैकी विशाल शिंदे नाईक यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे सुरुवातीला तपास चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न झाला. तसेच घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही साहित्य चोरीला गेल्याचा देखावा तयार करण्यात आला होता; मात्र हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले आहे. खुनावेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून महत्त्वाची माहिती मिळवली आणि त्यानंतर तपासाला निर्णायक दिशा मिळाली. विशाल शिंदे नाईक आणि अथर्व शिंदे नाईक यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आणि जगताप कुटुंब एकमेकांचे शेजारी असून जुन्या वादातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हत्यानंतर आरोपी कामाच्या निमित्ताने राजस्थानला गेल्याचे समोर आले. गुन्ह्याच्या वेळी विशालचा मोबाईल सुमारे तासभर बंद होता आणि त्याआधी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. याच आधारे दोघांना अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी चोरीचा टीव्ही आणि खुनासाठी वापरलेले हत्यार चंद्रभागा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी नदीतून हे साहित्य जप्त केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या दुहेरी हत्याकांडामुळे गेल्या आठ महिन्यांत पंढरपूर पोलिसांवर मोठी टीका झाली होती. मात्र आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अवघ्या एका महिन्यात गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना गजाआड केले.








