BIG NEWS : धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला : न्यायदेवते क्षमा कर!
सरन्यायाधीशांसोबत शिंदेंचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा संताप
भारताचे ५३ वे सरन्यायाधीश सूर्य कांत हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे आयोजित सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्यातील एका फोटोवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि न्यायव्यवस्थेच्या विलंबावर कडक शब्दांत टीका केली आहे. “धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर!”, अशा आशयाची पोस्ट करत राऊतांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा मुंबई उच्च न्यायालयात भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी सरन्यायाधीशांना गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे अभिनंदन केले. याच भेटीचा फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राऊत यांनी केवळ फोटो शेअर केला नाही, तर त्यावर अत्यंत जळजळीत भाष्यही केले. “धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम!”, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे या भेटीमुळे न्याय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी सुद्धा एकनाथ शिंदेंनी विमानतळावर जाऊन सरन्यायाधीशांचे स्वागत केल्यावर राऊतांनी “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” असा टोला लगावला होता.
संजय राऊत यांच्या संतापामागे प्रलंबित असलेल्या न्यायालयीन सुनावण्यांचे मोठे कारण आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ‘धनुष्यबाण’ आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ‘घड्याळ’ आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला मिळाले आहे. या दोन्ही निर्णयांविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणावर अंतिम निकाल लागलेला नाही. विशेष म्हणजे, बुधवारपासून (२१ जानेवारी) या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार होती, मात्र ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. एका बाजूला सुनावणी लांबणीवर पडणे आणि दुसऱ्या बाजूला सरन्यायाधीशांच्या दौऱ्यात सत्ताधारी नेत्यांची जवळीक दिसणे, यामुळे ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. निकालाचा कौल आधीच निश्चित झाला आहे का? असा सूचक सवाल संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.









