प्रस्तावना : ‘‘सरकार किसीकी भी हो, व्यवस्था तो हमारी है,’’ हा केवळ ‘सिने-संवाद’ नाही, तर ते आजचे विदारक वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली ही व्यवस्था इतकी बुरसटलेली आहे की, सत्ता कुणाचीही असो, व्यवस्थेचा ‘हिंदुविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ चेहरा सहसा बदलत नाही. याच व्यवस्थेत देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’ म्हणून डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. याच पक्षपाती व्यवस्थेच्या दिरंगाईचा आणि जाचाचा बळी ठरले आहेत, सनातन संस्थेचे निष्पाप साधक समीर गायकवाड! समीर यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून, एका निर्दोष जीवाचा या निष्ठुर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे.
समीर यांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? : गेल्या दशकात दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या हत्या प्रकरणांची प्रचंड चर्चा झाली. माध्यमांनी या व्यक्तींना अवास्तव प्रसिद्धी देऊन मोठे केले; परंतु या हत्यांचा तपास निष्पक्षपणे करण्याऐवजी, एका विशिष्ट विचारसरणीला लक्ष्य करण्यासाठी आणि ‘भगव्या दहशतवादा’चे खोटे नॅरेटिव्ह रुजवण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर झाला. तपासातील त्रुटी म्हणजे हत्येमागे आर्थिक वाद, कौटुंबिक कलह, बाईचे प्रकरण किंवा व्यावसायिक शत्रुत्व असे अनेक पैलू असू शकतात; मात्र तपास यंत्रणांनी केवळ ‘सनातन संस्थे’ला लक्ष्य करून चारही हत्यांचा सखोल तपास न करता ‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीचे आरोपपत्र प्रत्येक ठिकाणी दाखल केले.
समीर यांना २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. एका गाडीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी हत्या केली. त्यातील एक समीर गायकवाड आहे, असे तपास यंत्रणांनी सांगितले. वास्तविक हत्येच्या दिवशी समीर गायकवाड हे पालघरला होते. तपासादरम्यान पोलिसांनाही त्यांच्या कॉल डिटेल्सद्वारे आढळून आले की, पानसरेंच्या हत्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण कोणाच्या दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही, याचा तपास व्हायला हवा ! उलट एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला, त्याने समीर यांना ओळखले; पण वर्षभरातच समीर खूनी नसून ते दोन खूनी भलतेच आहेत म्हणून जाहीर केले. काही महिन्यांनी पुन्हा नवीन दोन नावे समोर आणली. मग दुसरे दोन जर हत्यारे असतील, तर पहिल्यांवरचे आरोप रहित केले पाहिजे होते; पण ते हेतूतः केले गेले नाहीत. याचा अर्थ, समीर निर्दोष असल्याचे माहीत असल्याने त्यांचा खटला चालवायचा नाही आणि दुसरीकडे त्यांचे नाव असलेले पहिले दोषारोपपत्र कायम ठेवून त्यांचा समाजिक जीवन उद्ध्वस्त करून छळही करायचा, ही असुरी प्रवृत्ती आहे.

या हेतुपुरस्कर व खोट्या तपासामुळे समीर गायकवाड यांच्यासारख्या पापभिरू साधकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खोट्या आरोपांमुळे झालेली बदनामी आणि न्यायालयीन प्रक्रियेचा ताण यांमुळे सार्वजनिक आणि जीवन जगण्यात येत असलेल्या अडचणी यांमुळे समीर प्रचंड ताणाखाली होते आणि यामुळेच समीर यांना हृदयविकाराचा झटका आला असे त्याचे कुटुंबीय ठामपणे सांगत आहेत. हा नैसर्गिक मृत्यू नसून, हिंदुविरोधी व्यवस्थेने, डाव्या विचारसरणीच्या टोळ्यांनी आणि तपास यंत्रणांनी केलेल्या ‘खोट्या आरोपांचा बळी’ आहे.
निर्दोषत्वाचा सर्वात मोठा पुरावा : ‘खटला चालवा’ ही मागणी! : समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची आणि त्यांच्या वकिलांची भूमिका. सर्वसाधारणपणे गुन्हेगार खटला लांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या प्रकरणात समीर गायकवाड यांनी स्वतःहून “माझा खटला लवकरात लवकर Fast Track चालवा,” अशी लेखी मागणी केली होती. दुसरीकडे, पानसरे कुटुंबीय आणि तपास यंत्रणा मात्र खटला रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. अजमल कसाबसारख्या नराधम अतिरेक्याला सरकारी खर्चाने वकील मिळतो; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून समीर यांना वकील मिळू दिला जात नाही. दहशतवादाच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेल्या अतिरेक्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडते; पण संविधानाच्या गप्पा मारणारे समीर यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करतात, ही लोकशाहीची थट्टा आहे.
खोटे नॅरेटिव्ह हाणून पाडा : आजच्या व्यवस्थेत ‘हाऊस अरेस्ट’चे कोणतेही प्रावधान नाही; पण तरीही पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांना ‘हाऊस अरेस्ट’ करण्याचे फर्मान सोडले जातात. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर न्याय व्यवस्थेकडून शोक व्यक्त होतो; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त होऊन भाजप सरकारवर टीका केली. तसेच थेट संयुक्त राष्ट्र संघाकडून शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले जाते. यातून इकोसिस्टीम किती मोठी आहे हे समजते. ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणारा उमर खालिद याची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी न्यूयॉर्कचे महापौर ममदानी पत्र लिहितात. समीर गायकवाड हे या हिंदुविरोधी नॅरेटिव्हचे बळी ठरले आहेत. त्यांच्यासाठी कोण पत्र लिहिल का, कोण आवाज उठवणार का?, हा प्रश्न आहे. जर भविष्यात असे बळी जाऊ द्यायचे नसतील, तर देशरक्षण आणि धर्मरक्षणाची तळमळ असणाऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. केवळ ‘फील गुड’ अर्थात् ‘सर्व काही छान चालले आहे’ या भ्रमात न राहता, या व्यवस्थेतील डाव्या विचारसरणीच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांचा ढोंगीपणा उघडा पाडणे आणि हिंदुविरोधी अपप्रचाराच्या विरोधात सक्षमपणे लढा देणे, हीच समीर गायकवाड यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल!
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था









