कोल्हापूर – निष्पाप असलेल्या हिंदुत्वनिष्ठ कै. समीर गायकवाड कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रशासकीय व्यवस्था आणि पुरोगामी ‘इकोसिस्टिम’ यांच्या खोट्या आरोपांचा बळी ठरले. केवळ सनातन संस्थेचा साधक असल्याने त्यांना कारागृहात रहावे लागले आणि यात त्याचे निष्पाप कुटुंबियही भरडले गेले. तरी यापुढील काळात ‘समीरसारखे आणखी किती बळी आपण जाऊ देणार ?’ असा प्रश्न संतप्त प्रश्न उपस्थित करत समीर यांच्या कुटुंबियांना शासनाकडून ठोस साहाय्य मिळावे, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. ही मागणी राधाकृष्ण मंदिर येथे कै. समीर गायकवाड यांच्यासाठी आयोजित श्रद्धांजली सभेत करण्यात आली. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी कै. समीर यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक साहाय्य घोषीत केले.
या सभेचे आयोजन ‘सकल हिंदू समाज’, ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना’ व ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने करण्यात आले होते. समीर यांच्यासाठी खटला लढवणार्या अधिवक्त्यांपैकी एक असलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘कै. समीर हे हत्येच्या दिवशी पालघर येथे असूनही यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांचा बळी ठरले आणि त्यांना कॉ. पानसरे यांच्या हत्येचा आरोप सहन करावा लागला. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना शिक्षा झाल्यावर ‘आपणही निर्दाेष असतांना आपल्याला अशी शिक्षा होऊ शकते’, हा ताण सतत त्यांच्या मनावर होता. ‘मिडीया ट्रायल’मुळे त्यांना कारागृहात रहावे लागले आणि अधिक सुरक्षेच्या नावाखाली कारागृहात मोठ्या छळाला त्याला सामोरे जावे लागले.’’

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘पक्षातील नेत्यांशी चर्चा करून कै. समीर यांना ठोस साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. समीर यांची स्मृती चिरंतन रहाण्यासाठी त्यांच्या नावावे व्यासपीठ चालू करणे, रुग्णवाहिका चालू करणे असे काहीतरी केल्यास त्यांचे नाव सतत स्मरणात राहिल.’’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंतराव जांभळे म्हणाले, ‘‘न्याययंत्रणेतील त्रुटींमुळे समीर यांच्यासारख्या अनेकांचे खटले प्रलंबित रहात आहेत. तरी यापुढील काळात हिंदुत्वनिष्ठ शासनाने पुढाकर घेऊन अशा सर्वच खटल्यांचा लवकर निपटारा कसे होईल, हे पाहिले पाहिजे.’’
‘खटला संपल्यावर समीर निर्दाेष सुटला, तर त्यांना ज्यांनी अटक केली त्या पोलीस अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी शिवसेनेचे श्री. राजू यादव यांनी केली. सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘कसाबसारख्या कुख्यात आंतकवाद्याला वकील दिला जातो; मात्र समीर यांना कोल्हापूर येथे पुरोगाम्यांनी वकील मिळू दिला नाही, हे दुदैवी आहे.’’ सूत्रसंचालक श्री. बाबासाहेब भाेपळे यांनी हिंदु धर्मासाठी कार्य करणार्या समीर यांच्यासारखे बळी परत जाऊ न देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.

या सभेत हिंदुत्वनिष्ठ श्री. कमलाकर किलकिले, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, हिंदु महासभेचे प्रवक्ते श्री. सुनील सामंत, भाजपच्या महिला सरचिटणीस सौ. वंदना बंबलवाड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मराठा तितुका मेळावावाचे श्री. योगेश केरकर, श्री. प्रमोद सावंत यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









