समीर यांचे निधन, हा व्यवस्थेने घेतलेला बळीच ! – सनातन संस्था
सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे आज दुर्दैवी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. समीर यांना २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. एका गाडीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी हत्या केली. त्यातील एक समीर गायकवाड, असे तपास यंत्रणांनी सांगितले. एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला; पण वर्षभरातच ते दोन खूनी भलतेच आहेत म्हणून जाहीर केले. याचाच अर्थ समीर गायकवाड निर्दोष होते. तुरुंगातही त्यांना त्रास भोगावा लागला. १९ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते जामीनावर होते; मात्र न केलेल्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण होता. पानसरे खून खटल्यातील आरोपी ही प्रसिद्धीमाध्यमांतून झालेली बदनामी इतकी मोठी होती की व्यवसाय, नोकरी अशा सर्व ठिकाणी त्यांना त्रास झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील या निष्पाप साधकाचा तपास यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली बदनामी यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले होते. लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य धाब्यावर बसवत समीर गायकवाड यांना कोल्हापूरातून वकीलही मिळू दिला गेला नव्हता. या आणि अशा अनेक व्यवस्थेच्या अत्याचारांना त्यांना सामोरे जावे लागले; दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. हे निधन नसून व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली आहे.
जेव्हा समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली, त्या वेळी तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, पानसरेंच्या हत्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही. बचाव करतांना हे समीर गायकवाड न्यायालयासमोर आणू शकले असते; पण कदाचित आता ती संधी गेली. या प्रकरणात आजही त्यांची आरोपी क्र. १ म्हणून त्यांची नोंद आहे; परंतु समीर यांना जामीन मिळाल्यावर पोलिसांनी नवीन ‘थिअरी’ मांडत पानसरे यांचा खून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी केला, असे जाहीर केले. काही महिन्यांनी पुन्हा नवीन दोन नावे समोर आणली. समीर हे या सदोष तपासाचा नाहक बळी ठरले. पुरोगाम्यांच्या दबावामुळे सनातनच्या साधकांना अडकवण्याचे पाप पोलिसांनी केले का ?
गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सनातन परिवार सहभागी आहे. गायकवाड कुटुंबियांशी वेळोवेळी बोलणे झाले, तेव्हा समजले की, या प्रकरणात नाहक गुंतवल्याचा ताण समीर यांच्या मनावर नेहमी होता. त्यांचे सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त झाले होते. खूनातील आरोपी म्हणून त्यांना नोकरी मिळत नव्हती. या सर्व गोष्टींची भरपाई कोण देणार? अजमल कसाबसारख्या नराधम अतिरेक्याला सरकारी खर्चाने वकील मिळतो, फाशीच्या शिक्षा झालेल्यांसाठी रात्री १ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून समीर यांना वकील मिळू दिला जात नाही. शासन त्यांचा जमीन रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात जाते. उलट-सुलट पुरावे न्यायालयात पोलीस कोणाच्या दबावामुळे दाखल करतात ?
पुरोगाम्यांच्या वैचारिक दहशतवादाने शासनावर दबाव आला आणि आज शेवटी एक त्याचा बळी गेला, याचे दुःख आम्हाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी शोक व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्र संघाने शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. समीर गायकवाडसाठी कोणी उभा राहणार का, हा प्रश्नही इथे नमूद करण्यासारखा आहे, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले.