आता भारत डिवचणार्यांना सोडत नाही ! – संजय सेठ, संरक्षण राज्यमंत्री
नवी दिल्ली – भारत भूमी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची आणि विश्वकल्याण इच्छिणार्या सनातनी संस्कृतीची आहे. दुर्दैवाने मागील ६० ते ६५ वर्षांत आपल्याला अकबर-बाबरसारख्या आक्रमकांना ‘महान’ म्हणत गुलामगिरीच्या मानसिकतेत बंदिस्त केले गेले. गुलामगिरीची ती सारी चिन्हे आणि बेड्या पूर्णपणे तोडल्या जात आहेत. आता नवीन भारत जागा झाला आहे. जो कुणापुढेही झुकत नाही आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य जगासमोर सिद्ध झाले आहे. आता भारताला डिवचणार्याला आम्ही सोडत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांनी केले. ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘राष्ट्रीय सुरक्षितेत सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे योगदान’ या विषयावर बोलत होते.
श्रीराम मंदिरासाठीचा न्यायालयीन लढा ही श्रीरामाने दिलेली अनुभूतीच ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजू
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू म्हणाले, ‘श्रीराम मंदिरासाठी हिंदूंनी न्यायालयाबाहेर दिलेला लढा अपूर्व आहे; मात्र आम्ही अधिवक्त्यांनी त्याविषयी न्यायालयात दिलेला लढा म्हणजे श्रीरामाने आम्हा सर्वांसाठी दिलेली त्याच्या अस्तित्वाची अनुभूतीच आहे. श्रीरामाच्या कृपेमुळेच ऋषितुल्य ज्येष्ठ अधिवक्ता केशव परासरन् यांनी वयाच्या ९२ व्या वर्षीही हा लढा जोमाने दिला. त्यांच्यात दुर्दम्य श्रद्धा निर्माण करणाराही श्रीरामच होता.
चिक्कमंगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठात होणारे नमाजपठण लवकरच बंद होईल ! – प्रमोद मुतालिक
या वेळी श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तपिठाच्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयाने साधना केली होती; मात्र टिपू सुलतानने तेथे बाबा बुडन दर्गा स्थापन केला. त्यानंतर तेथील शेकडो एकर परिसराचे मजारी, थडगी, दफनभूमी, दर्गा, गोमांसभक्षण यांमुळे इस्लामीकरण झाले होते; मात्र गेली ३० वर्षे विश्व हिंदु परिषद, श्रीराम सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेली आंदोलने आणि दिलेला न्यायालयीन लढा यांमुळे ९० टक्के परिसर दत्तभक्तांचा बनला आहे. आता शुक्रवारी नमाजपठण करायला मौलवी येतो. तेही लवकरच न्यायालयाच्या आदेशाने बंद होईल.
मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे ! – सुनील घनवट
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत; म्हणून मंदिरे व मंदिरातील परंपरांचे रक्षण होण्यासाठी ‘मंदिर महासंघा’ने १५ हजार मंदिरांचे संघटन केले आहे. त्यातून २ हजार ३०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून केवळ देशातच नव्हे, तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातही वस्त्रसंहिता लागू झाली आहे. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक आठवड्याला २० हजार हिंदू आरतीसाठी एकत्र येतात. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी एक होणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महारष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक व मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. या सत्राचे सूत्रसंचालन पत्रकार श्वेता त्रिपाठी यांनी केले.









