सेम टू सेम आर्ची! पुणे निवडणुकीत ‘आर्ची’सारखी दिसणारी उमेदवार कोण?

सेम टू सेम आर्ची! पुणे निवडणुकीत ‘आर्ची’सारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Municipal Corporation Election : राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबईसह पुणे महापालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. युती-आघाडींची गणितं स्पष्ट होत असतानाच पुण्यातील एका तरुण उमेदवाराची चर्चा रंगू लागली आहे.

पुण्याच्या प्रभाग क्रमांक ७ मधून २४ वर्षीय अंजली ओरसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात कमी वयाच्या उमेदवारांपैकी एक म्हणून अंजलींकडे पाहिलं जात आहे. सोमवारी वडील आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. गोखले नगरची कन्या अशी त्यांची ओळख आहे.

अंजली ओरसे या माजी नगरसेवक विनोद ओरसे यांच्या कन्या असून, त्यांनी आता थेट राजकीय रिंगणात उडी घेतली आहे. “भाजपकडून अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळेच विकासासाठी मी निवडणूक लढवत आहे,” असं अंजली यांनी स्पष्ट केलं.

विशेष बाब म्हणजे, सैराट चित्रपटातील आर्चीसारखं दिसणं यामुळे अंजली सोशल मीडियावर आणि प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रभागातील विविध भागांत फेरफटका मारत विकासकामांचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रभागात भाजपविरोधात रोष असल्याचं सांगत, “विकासाचा अभाव हा मुद्दा माझ्यासाठी ताकद ठरेल,” असा विश्वास अंजली ओरसे यांनी व्यक्त केला आहे. पुण्याच्या निवडणुकीत ‘सेम टू सेम आर्ची’ म्हणून ओळख मिळवणारी ही तरुण उमेदवार मतदारांच्या मनात कितपत ठसा उमटवते, हे निकालातून स्पष्ट होईल.