पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत, १६ हजार ३१८ कोटींचा ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे बांधणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा; नव्या वर्षासाठी राज्यात दीड लाख कोटींची कामे मंजूर

नागपूर : केंद्रीय रस्ते आणि भुपृष्ठ वाहतूक  मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील पायाभूत सुविधांना चालना देणारी मोठी घोषणा केली आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान नवीन ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे बांधला जाणार असून, यामुळे दोन्ही शहरांतील अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल. हा १६ हजार ३१८ कोटी रुपयांचा मेगा प्रकल्प असून, यात दोन मुख्य मार्गांचा समावेश आहे. पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा राहील, तर दुसरा मार्ग शिक्रापूरहून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून काढला जाईल. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतरही अडीच ते पावणे तीन तासांत पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

नागपूर विधानभवन परिसरात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, येत्या नवीन वर्षात राज्यात एकूण दीड लाख कोटी रुपयांची रस्ते विकासकामे मंजूर झाली आहेत. यापैकी ५० हजार कोटी रुपयांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली जाणार आहेत. तसेच, सीआरएफ आणि अॅन्युअल प्लान अंतर्गत ६० हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यातील २० हजार कोटींची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यासाठी जवळपास ५० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून, ही सर्व कामे येत्या तीन महिन्यांत सुरू होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेला समांतर नवा मार्ग

याशिवाय, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेला समांतर नवा एक्स्प्रेसवे बांधला जाणार आहे. अटल सेतू-जेएनपीटी ते पुणे-शिवार जंक्शन असा १३० किलोमीटरचा ग्रीनफील्ड लिंक असलेला हा प्रकल्प सुमारे १५ हजार कोटींचा आहे. यातील पागोटे ते चौक हा पहिला टप्पा मंजूर झाला असून, यामुळे पुणे-मुंबई अंतर दीड तासांत आणि पुणे-मुंबई-बेंगळुरू साडेपाच तासांत पार करता येईल.

पुण्याला सर्वाधिक निधी

– पुणे शहर आणि परिसरातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्पाचा समावेश आहे. हा चार स्तरावरील (खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि वर मेट्रो) ४ हजार २०७ कोटींचा प्रकल्प असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल. हडपसर ते यवत एलिव्हेटेड प्रकल्प ५ हजार २६२ कोटींचा असून, त्याचा डीपीआर सुरू आहे आणि कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. नाशिक फाटा ते खेड हा मार्ग दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा (नाशिक फाटा ते आळंदी फाटा) ४ हजार ४०३ कोटी आणि दुसरा (आळंदी फाटा ते खेड) ३ हजार ३९८ कोटींचा आहे. याचे ९३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

– मराठवाडा आणि विदर्भातील प्रकल्पांबाबत गडकरी म्हणाले, चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर २ हजार ८०० कोटींचा नवीन मार्ग, नागपूर-काटोल सेक्शनचा ९ किलोमीटर मार्ग, काटोल आणि जाम बायपास, २ हजार कोटींचा नागपूर-भंडारा सहापदरी मार्ग मंजूर झाला आहे. तसेच, तळोदा ते शहादा (१,०७४ कोटी), तळोदा ते यावल (१ हजार २४५ कोटी) आणि तळोदा ते रावेर (१४०० कोटी) असे चारपदरी मार्ग होणार आहेत.

– कळंबोळी विकास प्रकल्प ७७० कोटींचा असून, जुने पुणे नाका ते सातारा चौक उड्डाणपूल आणि वेस्टर्न बायपास ते पुणे-सातारा रोडचा नवीन डीपीआर (साडेसहा ते सात हजार कोटी) तयार होणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.