पुणे महापालिकेच्या सर्व १६५ जागा स्वबळावर लढवणार; ‘शहर करू सिंगापूर’चा संकल्प – प्रा. नामदेवराव जाधव

पुणे : सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक घोषणा केल्या. “शहर करू सिंगापूर” या धोरणाअंतर्गत सनय छत्रपती शासन पक्ष पुणे महानगरपालिकेच्या सर्व १६५ जागा स्वबळावर लढवणार असल्याची स्पष्ट माहिती त्यांनी दिली. याच धर्तीवर राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकाही पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. जाधव यांनी पुणे जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. सध्या पुणे जिल्ह्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल ३१६ इतका धोकादायक पातळीवर पोहोचला असून, सिंगापूरमध्ये तो केवळ १२ ते १५ दरम्यान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सुमारे २० वर्षांनी घटत असल्याची अत्यंत गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.

शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे धुळीचे आणि प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र, या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका त्यांनी केली. सिंगापूरमध्ये बांधकाम स्थळी धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना राबविल्या जातात, मात्र पुण्यात त्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहराचा विकास आजही पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि रस्ते अशा मूलभूत प्रश्नांपुरताच मर्यादित राहिल्याची खंत व्यक्त करत प्रा. जाधव म्हणाले की, शहराच्या खऱ्या विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, पर्यावरणपूरक धोरणे आणि पारदर्शक प्रशासनाची गरज आहे. मात्र, वारंवार तेच चेहरे निवडून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, आतापर्यंत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकासकामे केली नसल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

सनय छत्रपती शासन पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास पुणे शहराचा नियोजनबद्ध, पारदर्शक आणि सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही प्रा. नामदेवराव जाधव यांनी दिली. “स्वच्छ हवा, शिस्तबद्ध वाहतूक, पर्यावरणस्नेही बांधकामे, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नागरिक-केंद्रित प्रशासन” या मुद्द्यांवर पक्ष ठामपणे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत राहुल मते यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभावी तयारी केली जाईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.