Pune Big News : अखेर प्रशांत जगतापांचा राजीनामा; सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामा

विशाल भालेराव

सिंहगड – शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या नाराजी नाट्यानंतर अखेर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक कामकाज, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच अंतर्गत समन्वयाच्या मुद्द्यावरून जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

या नाराजीचे पडसाद पक्षाच्या अंतर्गत बैठकींमध्येही उमटले होते. अखेर त्यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींंकडे सादर केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या घडामोडीमुळे शहराध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाची नियुक्ती कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यानच, खडकवासला मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. पारगे यांच्या संभाव्य प्रवेशामुळे खडकवासला मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.