उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे जाहीर पक्षप्रवेश
विशाल भालेराव
खडकवासला : येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुणे जिल्ह्यात मोठे बळ मिळणार असून आज गुरुवार दि. २५/१२/२०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भव्य जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मा. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सौ. पूजा नवनाथ पारगे (माजी सभापती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद पुणे) तसेच मा. नवनाथ रोहिदास पारगे (माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे) यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध गावांतील आजी व माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाची भूमिका, राज्यातील विकासकामे, शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.
सौ. पूजा पारगे आणि नवनाथ पारगे यांचा सामाजिक व राजकीय अनुभव, तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षात दाखल होत असल्याने येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी दुपारी १.३० वाजता डोणजे फाटा येथे एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.









