MHADA Lottery Result : ‘म्हाडा’च्या घरांकरिता विक्रमी २,१५,८४७ अर्ज, सोडत लवकरच; अर्ज छाननीसाठी लागणार वेळ
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वाचार हजार घरांच्या सोडतीत तब्बल २ लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. हा आजवरचा विक्रम असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. या सोडतीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्यात येणार होती. मात्र, अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक असल्याने छाननीसाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तारीख योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोडतीस अर्ज करण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.
‘म्हाडा’ने पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ४ हजार १६८ घरांची सोडत काढली आहे. अर्ज व अनामत रक्कम स्वीकृती ११ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर ठेवण्यात आली होती. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता व इतर कारणांमुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत होती. त्यानुसार पहिल्यांदा २० नोव्हेंबरची मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ देऊन अंतिम मुदत ३० नोव्हेंबर अशी करण्यात आली.
नवीन वेळापत्रकानुसार अर्ज करण्यासाठी, तसेच ऑनलाइन रक्कम भरण्यासाठी ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर बँकेत ‘आरटीजीएस’, ‘एनईएफटी’द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी १ डिसेंबर अशी मुदत देण्यात आली. या सोडतीसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जासाठी ७०८ रुपये शुल्क आणि २० हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार अर्जदारांनी ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये ‘म्हाडा’कडे जमा केले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्याने ही सोडत लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.








