दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात प्राचीन युद्धकलेचा जागर!

नवी दिल्ली – दिल्लीतील भारत मंडपम् येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात’ भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये वीरश्री, राष्ट्रभक्ती आणि आत्मसंरक्षणाची तीव्र जाणीव जागवली.
महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन, मणिपूर राज्याच्या पारंपरिक थांग-ता युद्धकलेचे तलवार, भाला व ढालींसह सादरीकरण, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून महिलांची छेडछाड व धर्मांधांकडून होणाऱ्या अत्याचारांना प्रतिकार करण्याची वास्तवदर्शी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
विशेष आकर्षण ठरले ते अफजलखान वधाचे रोमांचकारी सजीव चित्रण! पहेलगाम येथील दहशतवादी आक्रमणाला शिवकालीन रणनितीच्या माध्यमातून कसे चोख प्रत्युत्तर देता येऊ शकते, हे स्वसंरक्षणाच्या विविध प्रकारांसह प्रभावीरीत्या मांडण्यात आले. या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक थरारून गेले.

मणिपुरी थांग-ता युद्धकलेतील तलवार (थांग), भाला (ता), ढाल आणि युद्धतंत्र यांचे शास्त्रशुद्ध, शौर्यपूर्ण सादरीकरण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. कोल्हापूरस्थित ‘सव्यासची गुरुकुलम’ संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शौर्यप्रदर्शनात शिवकालीन युद्धतंत्र आणि मराठी शस्त्रपरंपरेचा प्रभावी समन्वय साधण्यात आला. यामध्ये शस्त्रांचा प्रत्यक्ष वापर, संकटसमयी आत्मरक्षण, महिलांवरील छेडछाडीच्या प्रसंगी बचाव, तसेच अनेकांकडून होणाऱ्या आक्रमणाला धैर्याने प्रतिकार कसा करावा, याची सजीव प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

यासोबतच ऋषी-मुनींनी सांगितलेल्या सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भूमीनमस्कार तसेच विविध पारंपरिक व्यायामप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या व्यायामपद्धती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणाऱ्या असून भारतीय संस्कृतीतील आरोग्य व शौर्य यांचा अविभाज्य संबंध अधोरेखित करतात.
या वेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार श्री. सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, प.पू. शांतिगिरी महाराज, पू. पवन सिन्हा गुरुजी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह हजारो धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.










