Maharashtra Election Result 2025 : राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे आता २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, या कालावधीत कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मनाई असेल.
याआधी राज्य निवडणूक आयोगाने काही नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आज मतदान सुरू असून, मूळ निकाल उद्या जाहीर होणार होते. मात्र, आता सर्व निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर केले जाणार आहेत.
निवडणुकीत संपूर्ण पारदर्शकता राहावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालाचा पुढील मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. त्यावर सुनावणी घेऊन न्यायालयाने आज हा महत्त्वाचा निर्णय दिला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यातील जवळपास २० जिल्ह्यातील काही नगरपालिकांचे प्रभागातील मतदान पुढे ढकलण्यात आले. त्यामध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.
प्रशासनावर ताण वाढणार
आजच्या मतदानातील सर्व ईव्हीएम मशिन २१ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येणार असल्याचे समोर आले आहे.








