कन्नड अभिनेत्री नंदिनीचे आई-वडील दोघेही सरकारी शाळेत शिक्षक होते. तिचे वडील एस. महाबळेश्वर यांचे २०२१ मध्ये निधन झाले. तिची आई जीआर बसवराजेश्वरी या विजयनगरमधील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. वडिलांच्या जागेवर नंदिनीला सरकारी नोकरी मिळत होती. अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करण्यासाठी तिच्या कुटुंबातून तिच्यावर दबाव होता, असे नंदिनीने तिच्या डायरीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. बंगळुरूतील केंगेरी परिसरातील इंस्टा लिव्हिंग हॉस्टेलमध्ये नंदिनी राहत होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बंगळुरूत अभिनय शिकण्यासाठी क्लास लावला होता. तसेच ती अभिनय शिकत असल्याने महाविद्यालयात गैरहजर राहायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

२८ डिसेंबर (रविवार) रोजी नंदिनी बॉयफ्रेंड पुनीतच्या घरी गेली होती. रात्री ११.२३ वाजता ती हॉस्टेलमध्ये आली. त्यानंतर पुनीतने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, नंदिनीचा फोन लागत नव्हता. पुनीतने याबाबत हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी नंदिनी दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी दरवाजा तोडून तिच्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तपासले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करावी, असा दबाव नंदिनीवर होता. पोलिसांना मिळालेल्या डायरीत याबाबत नंदिनीने लिहिलेले आढळून आले. नंदिनीने आत्महत्या केल्याची माहिती समजताच तिची आई नातेवाईकांसह घटनास्थळी आली होती. नंदिनीच्या आईने तिच्या आत्महत्येबाबत कोणावरही संशय नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तसेच करिअर निवडण्याविषयी असलेल्या वादातून नंदिनीने आत्महत्या केल्याचे तिची आई म्हणाली. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.