खुशखबर! सिडकोच्या घरांच्या किमतीत १०% कपात, १९ हजार घरांची महागृहनिर्माण लॉटरी जाहीर
नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सिडकोकडून तब्बल १९,००० घरांची महागृहनिर्माण योजना आजपासून जाहीर करण्यात आली असून, घरांच्या किमतींमध्ये थेट १० टक्के कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसरात घर खरेदी करणे आता अधिक परवडणारे ठरणार आहे.
“माझे पसंतीचे सिडकोचे घर” ऑक्टोबर २०२४ योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा सहभागी होण्यासाठी १० दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. तसेच नव्या योजनेसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी www.cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.
या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नवी मुंबईतील महत्त्वाच्या नोड्समध्ये घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध प्रवर्गांतील घरांसाठी सिडकोने यापूर्वी निश्चित केलेल्या दरांमध्ये आता १० टक्के कपात करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे ही घोषणा केली. विशेषतः EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) आणि LIG (अल्प उत्पन्न गट) या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याने गरजू घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरात सुमारे १७ हजार घरे आधीच बांधून तयार केली असून, या घरांची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.
दरम्यान, जुन्या प्रकल्पांतील लाभार्थ्यांना तातडीने घरे देणे तसेच आगामी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर हौसिंग स्टॉक निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील वन, कांदळवन, सीआरझेड क्षेत्रे तसेच रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण यांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी पीएपी (प्रकल्पग्रस्त) नागरिकांना घरे देण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच गिरणी कामगार, डब्बेवाले, माथाडी कामगार यांसारख्या गरीब व गरजू घटकांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी ही योजना निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.









