उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. अजयपूर गावात वधूचं लग्न धूमधडाक्यात सुरू होतं. वडिलांनी मेहनतीनं कमावलेल्या पैशातून आणि शेवटचा आधार असलेली जमीन विकून मुलीचं लग्न ठरवलं होतं. वरातही मोठ्या थाटामाटात पोहोचली आणि वधू–वरानं जयमाला विधीपर्यंत सर्व काही व्यवस्थित पार पडलं.
पण विधी सुरू होण्याआधीच वधू अचानक गायब झाली. कपडे बदलण्यासाठी खोलीत गेल्यानंतर तिला प्रियकराचा फोन आला आणि त्यानंतर तिने थेट पळ काढला. मंडपात सगळे विधी सुरू असताना वधू दिसेनाशी झाली. शोधाशोध केल्यानंतर गावकऱ्यांकडूनच माहिती मिळाली—ती प्रियकरासह निघून गेली आहे.
मुलीच्या वडिलांनी तिला फोन केल्यावर तिनं स्पष्ट सांगितलं की ती आता प्रियकरासोबतच राहणार आहे. या धक्क्यानंतर वरपक्षाला रिकाम्या हातानं परत जावं लागलं.
दरम्यान, कुटुंबासाठी आणखी वेदनादायक गोष्ट म्हणजे, मजुरी करणाऱ्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी दीड महिन्यापूर्वीच 8 एकर जमीन विकून सुमारे 8 लाख रुपये उभे केले होते. त्यातून त्यांनी मोटारसायकल, फ्रिज, वॉशिंग मशीन, बेड, सोफा आणि सोन्याची चेनपर्यंत सर्व तयारी केली होती.
या प्रकरणी वधूच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. घटनेमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.








