महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला

रायगड – जिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहचला आहे. त्यात मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. याठिकाणी मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या सुरुवातीपासून काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला होता. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते. त्याच ठिकाणी विकास गोगावले समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. सुशांत जाबरे यांनी शिंदेसेनेतून बाहेर पडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज मतदानाच्या दिवशी हे आमनेसामने आले तेव्हा समर्थकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सुशांत जाबरे यांना गोगावले समर्थकांकडून मारहाण झाली. जाबरेंनी बंदूक दाखवून विकास गोगावलेंना धमकावल्याचेही बोलले जात आहे.

याबाबत सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुकीत शांतता राहणे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. मात्र तिथले युवा नेते म्हणवणारे आज सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर स्वत: आत जात होते. तिथे निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. लोकशाहीत हे चुकीचे आहे. मतदान केंद्रावर जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यापुरता मर्यादित असतो. इतरांना तिथे प्रवेश नसतो. मात्र तरीही महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशी गुंडगिरी होतेय, धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा माणसं या प्रवृत्तीकडे वळतात. ज्यांची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार, प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. मतदान केंद्रावर हे स्वत: महाशय जातात, हे मी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातले होते. तिथल्या पोलीस निरिक्षकांच्या कानावर घातले. जो त्या शहरातील मतदारही नाही तो मतदान केंद्रावर जात होता. लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली.

दरम्यान, रायगडमधील निवडणुका सर्वश्रूत आहेत. महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. नेत्यांनी हे टाळले पाहिजे होते. महायुतीत असताना खालच्या पातळीवर जी भाषणे झाली, टीकाटीप्पणी झाली त्यामुळे कार्यकर्ते पेटून उठले. त्यामुळे नेत्यांची जबाबदारी होती. मला या घटनेची माहिती नाही. परंतु प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत असेल ती लढाई मैत्रीपूर्णच झाली पाहिजे. तिथली वस्तूस्थिती काय हे विचारून घेतल्यानंतर मी बोलेन. लोकसभा, विधानसभेची आठवण नेत्यांनी ठेवली पाहिजे. सुनील तटकरेंनी त्यांची बाजू मांडली तशी भरत गोगावले यांचीही काही बाजू असेल. तेदेखील योग्य असेल. कार्यकर्ते एकमेकांना भिडणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे होती. हे वातावरण युतीसाठी पोषक नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.