Shirur Accident : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील खंडाळे माथा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन बस आणि एका मोटारीचा समावेश झाला. या दुर्घटनेत १६ प्रवासी जखमी झाले असून, गंभीर जखमी चार जणांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर तीनही वाहने रस्त्यावर आडवी-तिडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली.
अपघात कसा घडला?
खासगी आरामबस (क्र. एमएच १४ सीडब्ल्यू ४१५५) पुण्याकडे भरधाव जात असताना खंडाळे माथ्यावरील हॉटेल नम्रता समोर चालकाचा ताबा सुटला. बसने पुढील एर्टीगा मोटारीला (क्र. एमएच १२ युसी ३६८६) धडक दिली. या धडकेमुळे मोटार रस्त्याच्या खाली फेकली गेली. अनियंत्रीत झालेली ही बस पुढेच जाणाऱ्या दुसऱ्या बसवर (क्र. एमएच १९ सीएक्स ४८८४) जाऊन आदळली.
धडक इतकी भीषण होती की आरामबसच्या पुढील भागाचे, दुसऱ्या बसच्या मागील भागाचे आणि मोटारीच्या उजव्या बाजूचे अक्षरशः लोणचं झाले. वाहनांचे तुकडे रस्त्यात विखुरले होते. जखमींच्या आरडाओरड्यामुळे वातावरणात एकच गोंधळ निर्माण झाला होता.
जखमींची नावे
या अपघातात
-
सचिन श्रीकिसन तायडे (३२, रा. चिखली, जि. बुलढाणा)
-
शेरखान अजित मुल्ला (रा. चऱ्होली, पुणे)
-
सिद्धार्थ अशोक इंगळे (रा. पातूर, जि. अकोला)
-
सौरभ रामचंद्र देशमुख
-
असिक असद शेख
-
चित्रा रमेश जोशी
-
राज पंजाबराव सुरवारे (रा. खामगाव, जि. बुलढाणा)
-
कैस्सार जुबेर शेख
-
गुड्डू छेगझास (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर)
-
बंडू जवाहर जगताप (रा. चिंचवड)
-
अमित वासुदेव सावंत
-
अनिल वासुदेव सावंत (दोघे रा. अकोला)
-
पृथ्वीराज राहुल इंगळे
-
प्राची केदार बर्वे (रा. शिवाजीनगर)
-
संगिता शंकर माहुरे (रा. हिंजवडी)
-
काव्या सचिन विधाटे (रा. बाणेर)
जखमी झाले.
वाहतूक कोंडी
अपघातानंतर तीन्ही वाहने रस्त्यावर अडकल्याने पुणे–नगर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने त्या बाजूची वाहतूकही कोलमडली. अखेर पोलिस आणि स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.
पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने शिरूर, शिक्रापूर व पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले.
खासगी बसचालक सचिन तायडे याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार संतोष पवार करीत आहेत.








