Pune Crime : गुंगीचे औषध देऊन महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?
पुणे – पुरुषांकडून स्त्रीवरील अत्याचाराच्या बातम्या आपण सातत्याने ऐकतो. मात्र पुण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका महिलेनेच पुरुषावर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पुरुष हा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून, आरोपी महिलेने स्वतःला वकील असल्याचे सांगत त्याच्याशी ओळख वाढवली. काही दिवसांनी गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
औषध देऊन ब्लॅकमेल?
तक्रारदार पुरुषाच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला प्रथम कोल्हापूर येथे, नंतर पुण्यातील कोथरूडमध्ये आणि अगदी काशी विश्वनाथ येथेही गुंगीचे औषध देऊन शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याचे अश्लील फोटो काढून सतत पैशाची मागणी केल्याचाही आरोप आहे.
“दोन लाख रुपये दे नाहीतर फोटो व्हायरल करते,” अशी धमकीही देण्यात आली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित पुरुषाने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. पत्नीने संबंधित महिलेला फोन केल्यानंतरही तिने धमक्या देणं सुरूच ठेवलं. “मी अनेकांना फसवलं आहे,” असेही तिने कबूल केल्याचा दावा तक्रारदाराने केला.
ओळख कशी झाली?
ही ओळख तुळजापूर येथे देवदर्शनाच्या वेळी झाली. त्या वेळी “तू माझ्या भावासारखा आहेस” असं म्हणून महिलेने संबंध प्रस्थापित केल्याचं पुरुषाने सांगितलं. आरोपी महिला काही काळ त्याच्या घरीही राहिली होती.
देवदर्शनासाठी नेण्याचे आमिष दाखवून आरोपी महिलेने तक्रारदाराची पत्नीचीही दिशाभूल केली आणि मुंबई–पुण्यातील विविध भागांत त्याला फिरवत ठेवले.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या महिलेकडून आणखी किती जणांना फसवले गेले आहे याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.








