Mumbai Crime : वाढदिवसाच्या पार्टीत नराधमी मित्रांचा थरकाप उडवणारा ‘गेम’, तरुणाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; ५ जण अटकेत
मुंबई हादरवणारी एक भयाण घटना कुर्ला परिसरातून समोर आली आहे. वाढदिवस साजरा करत असताना मित्रांनीच एका २१ वर्षीय तरुणावर पेट्रोल फेकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर फेज-३ इमारतीत वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता. केक कापण्याच्या वेळी अचानक त्या तरुणाचे पाच मित्र त्याच्यावर पेट्रोल ओतू लागले आणि क्षणात त्याला पेटवून दिले. या भीषण प्रकारानंतर आरोपी तरुणांना तिथेच डान्स करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत — ज्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाराची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी रवाना होत गुन्हा दाखल केला आणि सर्व आरोपींना अटक केली. या अमानुष कृत्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सध्या तपासात गुंतले असून या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.








