Pune MPSC Success Story
पुणे : जिद्द, न थकणारी मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर सामान्य घरातील मुलगाही प्रशासनात उच्च पदावर झेप घेऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कराडचा सुरज पडवळ. सुरुवातीला राज्य कर विभागात राज्य कर निरीक्षक (STI) म्हणून नोकरी मिळाल्यानंतर सुरज यांनी थांबायचं ठरवलं नाही. सातत्याने तयारी करून त्यांनी यंदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षेत क्लास-वन (SST) अधिकारी म्हणून निवड मिळवत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.
या यशामागे त्यांच्या कठोर मेहनतीसोबतच पुण्यात सोबत राहणाऱ्या रूममेट मित्रांची प्रेरणा मोठी ठरली. सुरज तयारीसाठी पुण्यात आले असताना त्यांच्या सोबतचे मित्र विविध सरकारी विभागांमध्ये आधीच अधिकारी झाले होते. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन सुरज यांनी स्वतःलाही आणखी मोठे उद्दिष्ट निश्चित केले.
MPSC चा निकाल जाहीर झाल्यानंतर या रूममेट ग्रुपची कहाणी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली. अनिकेत आणि सूरज गाढवे यांसारख्या मित्रांच्या प्रेरणेवर पुढे वाटचाल करत सुरज यांनी अखेर क्लास-वन अधिकारीपद मिळवत स्वतःच्या मेहनतीची शिदोरी सिद्ध केली.
सुरज म्हणतात, “STI पद मिळाल्यानंतर मी पुढे शिक्षण व तयारी सुरूच ठेवली. संयम, सातत्याचा अभ्यास आणि स्वतःवरचा विश्वास या बळावर आज हे स्वप्न पूर्ण झालं. क्लास-वन अधिकारीपद मिळाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.”
कराडमध्येच झाले संपूर्ण शिक्षण
सुरज यांचं प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण कराडमध्येच पूर्ण झालं. वडील निवृत्त शिक्षक, आई गृहिणी आणि बहीणही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण असल्याचा फायदा मिळाल्याचे ते सांगतात. कुटुंबाकडून मिळालेला मानसिक आधार ही त्यांच्या यशाची एक प्रमुख किल्ली ठरली.
पुणेकरांसाठी खास सुविधा! खडकवासला–स्वारगेट–खराडी मार्गावर धावणार स्वयंचलित मेट्रो
रूममेट मित्रांची साथ मोठी
“प्रसाद चौगुले, राकेश गीते, अनिकेत साखरे, सुरज गाढवे, निलेश खाडे आणि संकेत देसाई यांनी सतत प्रोत्साहन देत मला मोठे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्यामुळेच मी पुन्हा तयारीला लागलो आणि आज क्लास-वन पदावर पोहोचलो,” असं सुरज सांगतात. अभ्यासाच्या काळात त्यांनी काही क्लासेसदेखील केले. भगरे सर, प्रसाद चौगुले यांचे बंधू प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना मोठा फायदा झाला.
भविष्यातील ध्येयाविषयी बोलताना सुरज म्हणतात, “प्रशासनात काम करताना नागरिकांना सेवा अधिक सुलभतेने पोहोचावी, गरजूंपर्यंत मदत तत्परतेने मिळावी यासाठी मी कटिबद्ध आहे.”
सुरज पडवळ यांनी ‘आझाद मराठी’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल सविस्तर सांगितलं आहे.
ही कहाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








