Maharashtra Politics : निवडणुकांच्या आधी नवी घडामोड! ठाकरे बंधूंसोबतच आता आंबेडकर बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग
राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे बंधूंची वाढती जवळीक, पवार कुटुंबातील घडामोडी यानंतर आता आंबेडकर बंधू एकत्र येणार का, याबाबतही चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांना आणखी चालना देणारे संकेत स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहेत.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले, “प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ ठरलेला असतो. सध्या ठाकरे बंधू काळाच्या गरजेनुसार एकत्र आले आहेत. अशीच परिस्थिती आमच्याही वाट्याला आली, आणि योग्य वेळ आली, तर आम्हीही एकत्र येऊ.”
आंबेडकरी चळवळीच्या एकतेबाबत विचारलं असता ते म्हणाले की, हा विषय आता कालबाह्य झाला आहे. “आंबेडकरी चळवळीचं ऐक्य हा आता लोकांच्या मनातून गेलेला मुद्दा आहे. अनेक गट नामशेष झाले. लोकांना रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं असंही वाटत नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
यापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार घेतला होता. “प्रकाश आंबेडकर आणि माझ्या भेटी वाढल्या पाहिजेत, नव्या समीकरणांना मी पाठिंबा देईन,” असं आठवलेंनी म्हटलं होतं. मात्र अद्याप प्रकाश आंबेडकर यांची त्यांना साथ नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चांबाबत आनंदराज आंबेडकर म्हणाले, “आंबेडकरी समाजातून अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत, यासाठी ही युती केली. १० टक्के जागावाटपाबाबत शिंदे साहेबांशी चर्चा झाली आहे. आमची ताकद जिथे आहे, तिथे आमचे उमेदवार द्यावेत, अशी आमची भूमिका आहे.”
महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्याचे अनेक प्रयत्न पूर्वी झाले, परंतु ते स्थिरावू शकले नाहीत. सध्या आठवले यांचा गट काही प्रमाणात सक्रिय असला तरी इतर गटांचा प्रभाव नगण्य आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापून दलित राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
आता आठवलेंसोबतच आनंदराज आंबेडकरांनीही प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी संकेत दिल्याने दलित राजकारणात नवे समीकरण घडण्याची शक्यता वाढली आहे. पुढील महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, आंबेडकर बंधूंच्या एकतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








