Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळात लाडक्या बहिणींना ₹१५०० मिळणार का? नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची महिलांना आतुरता लागली आहे. मात्र, नोव्हेंबरचे पहिले २० दिवस उलटून गेल्यानंतरही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात महिलांना हप्ता मिळणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
साधारणपणे आचारसंहिता लागू असताना कोणत्याही शासकीय योजनेतील लाभ वितरित केले जात नाहीत. परंतु प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यानही लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांना हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिनाअखेरीस महिलांना खुशखबर मिळण्याची दाट शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे केवायसी पूर्ण करण्यासाठी महिलांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर दुसरा निर्णय म्हणजे वेबसाइटमध्ये तांत्रिक बदल करून, पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांनाही केवायसी करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे.








