पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! म्हाडाच्या 4,186 घरांसाठीच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवसांची सुवर्णसंधी मिळाली आहे.
साडेचार हजार घरांसाठी लाखोंचा प्रतिसाद
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह स्वीकारण्यात आले आहेत.
11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता या घरांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
-
ऑनलाईन अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2025, रात्री 11.59
-
RTGS/NEFT द्वारे भरणा करण्याची अंतिम मर्यादा: 1 डिसेंबर 2025, संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ
अनेक अर्जदारांना कागदपत्र पडताळणीसंबंधी तांत्रिक समस्या आल्याने आणि अधिक वेळ देण्याची मागणी केल्याने म्हाडाने ‘शेवटची संधी’ म्हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. सोडतीचे अद्ययावत वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. इतर सर्व अटी व नियम पूर्वीच्या जाहिरातीप्रमाणेच राहतील, असे पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चार प्रमुख घटकांत विभागलेली सोडत
म्हाडाच्या पुणे मंडळातील या सोडतीत एकूण 4,186 सदनिकांचा समावेश असून त्यांचे पुढीलप्रमाणे विभाजन करण्यात आले आहे—
-
म्हाडा गृहनिर्माण योजना – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य: 1,683 घरे
-
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य: 299 घरे
-
15% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA हद्दीतील): 864 घरे
-
20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMC, PCMC व PMRDA हद्दीतील): 3,222 घरे
पुण्यात घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.








