Employment : राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, कुणाला होणार थेट फायदा?

Employment : राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, कुणाला होणार थेट फायदा?

राज्यातील तरुणांना दर्जेदार, रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण मिळावे आणि जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्दिष्टाने कौशल्य विकास विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंत्रालयात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या करारानुसार टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये हलकी वाहन तंत्रज्ञ (LMV) अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा उभारणार आहे. यासोबतच संबंधित शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमातून सुमारे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

करारावर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या. येत्या दोन महिन्यांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, मार्च २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा कार्यरत होतील. उर्वरित प्रयोगशाळा तीन टप्प्यांमध्ये सुरू केल्या जाणार असल्याची माहिती विक्रम गुलाटी यांनी दिली.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, आयटीआय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभागातर्फे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे राज्यातील युवकांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच उद्योग क्षेत्रातील अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि शासनाकडील पायाभूत सुविधा यांच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोढा यांनी पुढील काळात अशा आणखी रोजगाराभिमुख सामंजस्य करारांना चालना मिळेल, असे संकेत दिले.