BIG NEWS : रुपाली ठोंबरे पाटील यांनी दंड थोपटले, मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; फेसबुक पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत घडामोडींनी पुन्हा एकदा रंगत घेतली आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदावरून रूपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने नवा वाद पेटवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांची नवी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील या दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. या निर्णयामागील कारणांबाबत पक्षाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दोन महत्वाच्या नावांची गैरहजेरी पक्षातील अंतर्गत मतभेद अधोरेखित करते आहे.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला होता. हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचला. त्यानंतर ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देत प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले होते.
सध्या त्या अजित पवारांची भेट घेणार असल्याचे समजते. अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर असून त्या भेटीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, रुपाली ठोंबरे पाटील यांना दोन्ही शिवसेना गटांकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, त्यांच्या फेसबुकवरील पोस्टने नव्या चर्चांना उधाण दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे —
“शेतकरीकन्या डॉक्टर निर्भया यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाणार नाही. ‘प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर ‘ख्वाडा’ करणाऱ्यांचा आहे.’ जय शिवराय, जय भीम, जय अहिल्या, जय भगवान!”
या पोस्टमुळे ठोंबरे पाटील पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आल्या असून, त्यांच्या पुढील पावलाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.








