१५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण, राष्ट्र रक्षणार्थ तसेच वारकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकरीता १५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

पुणे – वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा हि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म,संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी वारकरी समाज नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. हीच जाज्वल्य भक्ती,राष्ट्रनिष्ठा यातून समस्त वारकरी यांचे संघटनातून महत्वाच्या मागण्या शासनाकडे करण्याकरीता १५ नोव्हेंबर या दिवशी १९ व्या वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती,राष्ट्रीय वारकरी परिषद,वारकरी संघटना आणि संप्रदाय,सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गोदावरी धाम,बेट सरला यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे अधिवेशन दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ,आळंदी (देवाची), पुणे येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.मारुती शास्त्री तुणतुणे यांनी, पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री.नागेश जोशी, रणरागिणी शाखेच्या कु क्रांती पेटकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प.बापू महाराज रावकर, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.     

      या संदर्भात ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले, ‘‘गेली १८ वर्षे सातत्याने हे अधिवेशन घेण्यात येत असून वारकर्‍यांचे विविध प्रश्‍न सातत्याने मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा घेते. यंदाही वारकर्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे.’’  

     ह.भ.प. बापू महाराज रावकर म्हणाले कि, ‘‘या अधिवेशनामध्ये महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज, पिठाधीश,बेट सरला, श्री क्षेत्र गोदावरी धाम आणि जेष्ठ वारकरी संत,धर्मसंस्थापक यांची वंदनीय उपस्थिती असणार आहे.या परिषदेसाठी श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. 

या अधिवेशनाला समस्त वारकरी तसेच हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी ह.भ.प. बापू महाराज रावकर – (9975572684) यावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.